अमरावती - वरुड मोर्शी मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र भुयार यांचे जावयाचा शशांक हरिदास आमझरे यांचा मृतदेह आढळला आहे. पुलगाव परिसरातील तळणी रेल्वे मार्गापासून काही अंतरावर एका पुलाखाली हा मृतदेह आढळला. आमझरे यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शशांक आमझरे यांचा मृत्यू हा संशयास्पद आहे.
शशांक यांचा मृतदेह तळणी परिसरातील एका पुलाखाली दिसल्याची माहिती एका एक्सप्रेस चालकाने रेल्वे स्टेशनवरील अधिकाऱ्यांना शनिवारी रात्री दिली होती. मात्र, ही घटना बडनेरा जीआरपीच्या हद्दीत असल्यामुळे याची माहिती पुलगाव बडनेरा जीआरपीला देण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे बडनेरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी मिळालेल्या दुचाकीवरून मृताची ओळख पटली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली. मात्र, शशांक यांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत माहिती समोर आली नाही. दरम्यान आमदाराच्या जावयाच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.