अमरावती - सातपुडा पर्वत रांगेत ( Satpuda mountain range ) वसलेल्या मेळघाटचे जंगल पावसामुळे हिरवे गार झाले आहे. मेळघाटात सध्या पर्यटकांची गर्दी प्रचंड ( huge crowd of tourists in Melghat ) वाढली असून शनिवारी आणि रविवारी तर मेळघाटातील मुख्य पर्यटन स्थळी पाय ठेवायलाही जागा नाही अशी परिस्थिती आहे. एकूणच मेळघाटात सध्या निसर्गाच्या ( Nature ) विविध छटांची उधळण होत असताना पर्यटक सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात रममाण होत आहेत.
नद्यांना पूर, डोंगरातून वाहत आहेत धबधबे - मेळघाटातून वाहणाऱ्या सिपना, तापी , सापन या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत ( rivers overflowing ). डोंगरावरून वाहत येणाऱ्या या शुद्ध नद्यांच्या पाण्यामध्ये पोहण्याची आंघोळ करण्याची हाऊस अनेक पर्यटक भागवत आहेत. ज्यांना पाण्यात उतरण्याची भीती वाटते असे पर्यटक खळखळ वाहणाऱ्या नदीचे सौंदर्य टिपत त्या ठिकाणी छायाचित्र काढण्यासाठी लगबग करीत आहेत. परतवाडा शहरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटरच्या आत मेळघाटच्या जंगलात शिरल्याबरोबर वाहनांवरून धबधबे कोसळताना दिसतात. चिखलदरा ( Chikhaldara ) मार्गावर तसेच सेमाडोहकडे ( semadoh ) जाताना अनेक ठिकाणी रस्त्यावरून कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करीत असून या धबधब्यांमध्ये आंघोळ करण्याचा आनंद सुद्धा अनेक पर्यटक सध्या जंगलात विविध ठिकाणच्या धबधब्यांवर आढळून येत आहेत.
मेळघाटातील हे ठिकाण आहेत पर्यटकांची आकर्षण - चिखलदरा हे मेळघाटातील पर्यटकांचे सर्वात आकर्षणाचे केंद्र आहे. या ठिकाणी असणारे देवी पॉईंट ,कीचकदरी, गाविलगड किल्ला यासोबतच आमझरी हे पॉईंट पर्यटकांचे सर्वाधिक आवडते पॉईंट आहे. या सर्वच स्थळांवर सध्या गर्दी पाहायला मिळत आहे शनिवारी आणि रविवारी तर गर्दीमुळे चिखलदऱ्यात वाहन समोर सरकायला देखील अर्धा ते एक तास लागत होता अशी अवस्था आहे. चिखलदरा सोबतच सेमाडोह आणि कोलकास ( Kolkas ) या ठिकाणी देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. यासोबतच धारखोरा येथील धबधबा पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक पोहोचत असून याव्यतिरिक्त मेघाच्या जंगलात असे अनेक ठिकाण आहे ज्या ठिकाणी पर्यटक आनंद लुटत आहेत. धारणी तालुक्या चिखलदरा तालुक्याच्या तुलनेत पर्यटकांची गर्दी कमी दिसत असली तरी या भागात देखील तापी नदीचे ( Tapi River ) भरलेले सौंदर्य पावसाळ्यात पाहण्याची मजा काही औरच असल्यामुळे अनेक पर्यटक हाच तापी नदी पाहायला येतात. यासह गोलाई या मेघाटातील सर्वात उंच ठिकाणी असणाऱ्या मेघाटातील सर्वात सुंदर अशा धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पोहोचतात. मेळघाटात सध्या सातपुडा पर्वतरांग धुक्यात बुडालेली पाहायला मिळत असून अनेक ठिकाणी रस्ते धुक्यात बुडाले आहे तर उंचावर असणाऱ्या पर्यटकांना खाली संपूर्ण जग धुक्यात बुडाले आहे असे दृश्य पाहायला मिळते.
अशी आहे पर्यटकांना राहण्याची व्यवस्था - मेळघाटात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चिखलदरा सीमाडोह,कोलकास, हरिसाल या ठिकाणी विश्रामगृहासह टेन्ट हाऊस ची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच या भागातील आदिवासींच्या घरामध्ये स्टे होमची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या ठिकाणी थांबण्यासाठी अमरावती आणि परतवाडा येथून बुकिंग करावं लागतं तसेच वाइल्डलाइफ डिपार्टमेंटच्या वेबसाईट वर देखील आपल्या राहण्याचे ठिकाण आरक्षित करण्याची सोय आहे. या शासकीय सुविधांसोबतच चिखलदरा आणि सेमाडोह येथे खाजगी हॉटेल मध्ये राहण्याची व्यवस्था आहे.
मेळघाटात तरुणाईचा उत्साह - मेघटात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी अनेक कुटुंब येत असतानाच मित्र-मैत्रिणींसोबत दुचाकी वर मेळघाटचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या तरुणाईचा उत्साह सर्वाधिक प्रमाणात पाहायला मिळतो. रुळलेल्या पर्यटन स्थळांपेक्षा जंगलामध्ये कुठेतरी आड वाहणारी नदी तसेच धबधबे या ठिकाणी खास करून तरुण मुलं आनंद घेताना दिसतात. दारू पिऊन झिंगणाऱ्या काही तरुणांचा त्रास पर्यटकांना होतो मात्र याकडे पर्यटक दुर्लक्ष करतात. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर मात्र मेळघाटात प्रशासनाचे विशेष लक्ष नसल्याचे दुर्दैवाने पाहायला मिळते.
15 ऑगस्टला मेळघाट हाउसफुल - खरंतर दरवर्षी मेळघाटात 15 ऑगस्ट नंतर पर्यटकांची प्रचंड गर्दी वाढत असते. यावर्षी मात्र जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने जिल्ह्यात सर्वत्र नदी नानांना प्रचंड पूर आला असताना मेळघाटातून वाहणाऱ्या शुभ नद्या आणि डोंगरावरून कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी पहिल्यांदाच जुलै महिन्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. 15 ऑगस्ट ला दरवर्षीप्रमाणे मेळघाट याही वर्षी पर्यटकांनी हाउसफुल राहणार असून. या दरम्यान सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे मेळघाटातील पर्यटकांना राहण्यासाठी असणारी सर्व शासकीय व्यवस्था आतापासूनच हाउसफुल झाली असून खाजगी हॉटेल लॉज सुद्धा आतापासूनच आरक्षित केले जात आहेत.
मेळघाटातील व्यवसायिकांसाठी पर्वणीचा काळ - यावर्षी जुलै महिन्यापासूनच मेळघाटात पर्यटकांची प्रचंड गर्दी वाढली असल्यामुळे मेळघाटातील हॉटेल व्यवसायिक, लॉज मालक यासह या भागात खवा विक्रेत्यांसाठी हा पर्वणीचा काळ ठरतो आहे. मुसळधार पावसामुळे अनेक हॉटेल आणि लॉज चालकांनी आपल्या ठिकाणी असणाऱ्या मुक्कामाचे दर तिप्पट ते चौपटीने वाढवून ठेवले आहेत. विशेष म्हणजे पर्यटकांना देखील आपल्या आनंदासाठी हॉटेल आणि लॉज चालकांकडून केल्या जाणाऱ्या आर्थिक लुट सहन करावी लागत आहे.