अमरावती - कोरोनाची भीती वाटत असल्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी 29 डिसेंबरला होणारी सिनेटी बैठक ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याबाबत दोन दिवसांपूर्वी सिनेट सदस्यांना पत्र पाठले. मात्र बैठक ऑनलाई घेण्याला सिनेट सदस्यांनी विरोध केला आहे. तर दुसरीकडे विद्यापीठाच्या परीक्षा विभागासमोर सध्या हजारो विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. मात्र या विद्यार्थ्यांकडे विद्यापीठाचे दुर्लक्ष होत असून, त्यांना कोरोना धोका नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच केवळ 65 सदस्य संख्या असणाऱ्या सिनेट बैठकीला कोरोनाचे कारण सांगून, बैठक ऑफलाईन घेण्यास नकार देणऱ्या कुलगुरूंच्या भूमिकेबाबत देखील आक्षेप घेतला जात आहे.
गुणपत्रिका मिळाली नसल्याने वाढली गर्दी
अमरावती विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना, परीक्षेचा निकाल घाईगडबडीने लावल्याने अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे बी.ए, बी.कॉम आणि बीएससीच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात गर्दी केली आहे.
विद्यापीठाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
गेल्या 8, 10 वर्षांपासून विविध सत्रात सातत्याने नापास होणारे विद्यार्थी यावर्षी कोरोनामुळे सहज उत्तीर्ण झाल्याने, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आकडा वाढला आहे. मात्र आता विद्यापीठ अशा विद्यार्थ्यांच्या सर्व सत्रातील गुणपत्रिका तपासून, अंतीम वर्षाच्या गुणपत्रिकांचे वाटप करत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सर्व सत्रातील गुणपत्रिका सादर करण्यास सांगण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी विद्यापीठात गर्दी केली आहे. विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांचा एन्रॉमेंट क्रमांक असून त्याद्वारे विद्यपीठाला विद्यार्थ्यांचे सर्व सत्रातील गुण सहज उपलब्ध होऊ शकतात, मात्र विद्यार्थ्यांची सर्व माहिती खासगी कंपन्यांकडे असल्याने विद्यापीठ आता विद्यार्थ्यांचे मागील सत्रातील गुण पडताळणीसाठी विद्यर्थ्यांना विद्यपीठात बोलावत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कुलगुरूंचा प्रतिक्रिया देण्यास नकार
सिनेटची बैठक ऑनलाईन घेण्यासंदर्भात सिनेट सदस्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. आता विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका मिळत नाही, तसेच कोरोनाची भीती केवळ कुलगुरूंना वाटते विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे काय? याबाबत कुलगुरूंना प्रश्न विचारले असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.