अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेले जिल्ह्यातील सर्व मंदिरे आज भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. मंदिरे उघडताच शहरातील अंबादेवी आणि एकविरादेवी मंदिरात भाविकांनी गर्दी केली.
सकाळी 6 वाजता उघडले मंदिर
अमरावतीचे कुलदैवत असणाऱ्या आंबादेवी आणि एकविरा देवीचे मंदिर सोमवारी सकाळी 6 वाजता भाविकांसाठी उघडण्यात आले. दोन्ही मंदिरे हार-फुलांनी सजवण्यात आले होते. नवरात्र काळातही ही मंदिरे भाविकांसाठी बंद होती. मात्र आता सरकारची परवानगी मिळाल्याने मंदिरे खुली करण्यात आली आहेत. सकाळपासून भाविकांनी देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी केली.
कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी आवश्यक नियमांचे पालन करूनच भाविकांना मंदिरात प्रवेश -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मंदिर व्यवस्थापनाकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. भक्तांना सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तसेच येणाऱ्या भक्ताने मास्क घातला असेल, तरच त्याला मंदिरात प्रवेश दिला जात आहे. भक्तांच्या हातावर सॅनिटायझर लावण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
मंदिर परिसरातील व्यवसायिकांनी व्यक्त केला आनंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 8 महिन्यांपासून मंदिरे बंद होती. मंदिर परिसरात असणाऱ्या व्यवसायिकांना त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला. मात्र आता पुन्हा एकदा मंदिरे सुरू झाली आहेत. भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी केली आहे. त्यामुळे या व्यवसायिकांना फायदा झाला असून, त्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
हेही वाचा - ठाण्यात कोपिनेश्वर मंदिरात मनसेची आरती, मंदिरे उघडल्याबद्दल सरकारचे मानले आभार
हेही वाचा - ठाणे जिल्ह्यात अशीही परंपरा; गुरांना पेटत्या आगीवरून नेत शेतकऱ्यांची दिवाळी