अमरावती - राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यात संचारबंदीचे नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. आज रात्री 8 वाजतापासून ते 1 मे हे निर्बंध लागू असणार आहे. या दरम्यान, अत्यावश्यक सेवा ही सकाळी 11 वाजेपर्यंतच सूरु राहणार आहे. त्यामुळे आता बाजारपेठेत भाजीपाला, फळे खरेदी करण्यासाठी अमरावतीच्या इतवारा परिसरातील भाजी बाजारात सकाळी 7 वाजतापासून ग्राहकांनी गर्दी केली होती. यावेळी ग्राहकांनी व दुकानदारांनी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले आहे. येथे येणाऱ्या नागरिकांच्या तोंडाला मास्क नाही, तर कुठे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बुधवारी कोरोनाचे 520 नवे रुग्ण -
दरम्यान, अमरावतीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 520 नवे रुग्ण आढळले असून 9 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा 58385 पर्यंत पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत 813 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 5889 एवढी झाली आहे.
हेही वाचा - नाशिक ऑक्सिजन गळती प्रकरणात अज्ञाताविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल