अमरावती - अंजनगाव तालुक्यातील धनेगाव येथे 16 मे रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यात लाखोंचे नुकसान झाले आहे. या वादळाचा सर्वात जास्त फटका धनेगावला बसला असून धनेगाव येथील मोठ-मोठे वृक्ष उन्मळून पडले. गावातील अनेकांच्या घरावरील पत्रेही उडून गेले. असे भयानक वादळी रूप गावकऱ्यांनी कधीही पाहिले नव्हते.
यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लोकांच्या घरांचे, शेतातील संत्र्याच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोबतच यात गावातील काही जनावरे जखमी झाली आहेत. आधीच सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असल्याने देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्याचा उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अशातच आणखी एक नैसर्गिक आपत्ती धनेगाववासीयांवर आली आहे.
आमदार बळवंत भाऊ वानखडे यांनी तातडीने धनेगावात भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. याप्रसंगी जिल्हापरिषद उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सतिष हाडोळे. प्रमोद पाटील दाळू, पुरोषत्म घोगरे, विकास पाटील येवले यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.