अमरावती - शेतात येऊन पाहणी करून गेलो. कापूस वेचणीला आला होता, तर संत्रा तोडायचे होते. आता एक ते दोन दिवसात कापूस वेचायचा आणि संत्रा देखील तोडायचे ठरवले. मात्र, गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळला. त्यामध्येच गापीटीनेही भर टाकली आणि सर्व काही होत्याचे नव्हते झाले. अशी अवकळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.
गेल्या ४ दिवसांपासून विदर्भातील ढगाळ वातावरण आहे. गुरुवारी सकाळी पावसासह गारपिटीने पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. अमरावतीमध्ये मोर्शी, तिवास, वरूड, चांदूर बाजार तालुक्याला याचा फटका बसला आहे. यामध्ये तूर, गहू, कापूस, संत्रा, केळी, हरभरा, भाजीपाला ही पीके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
राजू गरडे यांनी त्यांच्या शेतात कापूस आणि तूर पीक लावले होते. सर्व काही चांगले होते. यंदा तुरीचे उत्पादन देखील जास्त होणार होते. तसेच कापसाची १ वेचणी झाली होती. दुसऱ्या वेचणीला कापूस आला होता. त्यांनी बुधवारी रात्री जाऊन कापसाची पाहणी केली. आता मजूर पाहून १ ते २ दिवसात कापसाची वेचणी करायचे ठरवले. मात्र, गुरुवारी रात्री पावसासह गारपीट झाली आणि कापूस पूर्ण जमीनदोस्त झाला. त्याच्यासोबतच तूर पिकाचेही अतोनात नुकसान झाले.
सध्या संत्र्याचा हंगाम सुरू आहे. संत्र्याचे उत्पादन देखील चांगले झाले. आता दुसऱ्या दिवशी संत्री तोडून बाजारात विक्रीसाठी न्यायची होती. मात्र, गारपीट आली आणि संत्र्यांच्या अक्षरशः सडा पडला. ते पाहून पायाखालची जमीनच सरकरली, असे संत्रा उत्पादक शेतकरी सतीश काळे सांगतात.
अवकाळी पावसाने फक्त या एक-दोन शेतकऱ्यांवर अवकळा आली नाही, तर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे संकट ओढावले आहे. ऑक्टोबर महिन्यामध्येही परतीच्या पावसाने सोयाबीन पिकांची नासधूस केली. आता कापूस वेचणीला आल्यावर अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे आता शेती करावी की नाही? असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.
गेल्या सरकारने नुकसान भरपाईची घोषणा केली. मात्र, शेतकऱ्यांना एकही पैसा मिळाला नाही. आता मात्र, महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांना किती मदत देते, की फक्त कगदपत्रे घेऊन शेतकऱ्यांना प्रतीक्षेत ठेवते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.