अमरावती - केंद्र सरकारच्या तब्बल ५३० कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील नांदगाव पेठ ते मध्यप्रदेशमधील पांढुरणापर्यंत नव्याने तयार केलेल्या ९६ किलोमीटरच्या सिमेंट निर्मित राष्ट्रीय महामार्गाला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. केवळ दीड ते दोन वर्षातच रस्त्याची ही गत झाल्याने महामार्गाच्या कामातील दर्जावर वाहन चालकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून या महामार्गाचे बांधकाम करण्यात आले. नांदगाव पेठ ते मध्यप्रदेशातील पांढुर्णापर्यंत असलेल्या ९६ किलोमीटरच्या या राष्ट्रीय महामार्गाला दोन टप्पे आहेत. पहिला टप्पा नांदगाव पेठ ते मोर्शी हा ४३ किलोमीटरचा असून यासाठी तब्बल २४० कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर, दुसरा टप्पा हा मोर्शी ते मध्यप्रदेश मधील पांढुरणा पर्यंत आहे. या ५३ किलोमीटरच्या कामासाठी तब्बल २९० कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, या दोन्ही टप्प्यात अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत.
दोन्ही टप्प्यातील ९० पॅनल पुन्हा बनवणार
महामार्गावर दोन्ही टप्प्यात साडेचारमीटरचे पॅनल आहे. या संपूर्ण महामार्गावरील तब्बल ९० पॅनलला भेगा पडल्या आहेत. खराब झालेल्या कामाची लांबी जवळपास २०० मीटरपेक्षा जास्त आहे. खराब झालेल्या ठिकाणचा रस्ता पुन्हा खोदून नव्याने तयार केला जाणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भोंडे यांनी दिली. तसेच, हा राष्ट्रीय महामार्ग ३० वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत मजबूत राहाणार आहे. पुढील १५ दिवसात भेगा पडलेला रस्ता चांगला केला जाईल, असेही भोंडे म्हणाले.
कंत्राटदार करणार पूर्ण खर्च
नांदगाव पेठ ते पांढुरणा या दरम्यान खराब झालेल्या या रस्त्यातील पॅनल उकलून पुन्हा ते व्यवस्थितरित्या दुरुस्त करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च संबंधित कंत्राटदार कंपनी करणार आहे. राजस्थानमधील जयपूर येथील एच.जी इन्फ्रा कंपनीला या महामार्गाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले होते.
हेही वाचा - मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना पुन्हा वाघाचे दर्शन