अमरावती - जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील खुर्माबाद येथे आज (मंगळवारी) सकाळी नऊच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दत्तात्रय विश्वनाथ नवलकार यांच्या गोठ्यामध्ये ही आग लागली होती.
विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य खांबावरील केबल शेतकऱ्याच्या गोठ्याच्या बाजूला आहेत. दरम्यान, आज सकाळी अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्याने नवलकार यांच्या गोठ्याला भीषण आग लागली. या आगीमध्ये शेतकऱ्याचे शेती मशागत संबंधित महत्त्वाचे साहित्य, पेरणी यंत्र, जनावरांना लागणारे खाद्यपदार्थ व आदी वस्तू असे एकूण 8 ते 9 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊनही घटनास्थळी वीज वितरण कंपनीचे कोणीही आले नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.