अमरावती - कोरोनाच्या पाश्वभूमीवर सध्या फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत 5 जणांच्या उपस्थितीत अनेक लग्न सोहळे पार पडत आहेत. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथेही अशाच पद्धतीचा आदर्श विवाह सोहळा पार पडला. नवरदेव राजीव राऊत आणि नवरी भाग्यश्री नवले यांनी विवाहसोहळ्यादरम्यान काठीच्या सहाय्याने एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातली.
या अनोख्या लग्न सोहळ्याची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे. लग्न सोहळ्यात नवरदेव नवरीसह उपस्थितांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर केला. सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचेही पालन केले. या सोहळ्याची संपूर्ण जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. कोरोना संकट संपल्यानंतरही अशाच पद्धतीने विवाह सोहळे पार पडल्यास मुलीच्या वडिलांना कर्जबाजारी होण्याची वेळ येणार नाही, हा संदेश या विवाहाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.