अमरावती - आधीच परतीच्या पावसाने संकटात सापडलेले सोयाबीन आणि कपाशी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. त्यातच आता पुन्हा कपाशी उत्पादक शेतकर्यांसमोर लाल्या रोगाच्या आक्रमणामुळे नवे संकट आलेले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेला परतीचा पाऊस आणि त्यात सकाळी पडणाऱ्या दवामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर कपाशी शेतीवर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे हिरव्यागार कपाशीची शेती लाल पडली असून कपाशी सुकल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
हेही वाचा - नाशिकच्या कांद्याचा वांदाच...केंद्राकडून 'या' दोन प्रकारच्या कांदा निर्यातीला परवानगी
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परतीच्या पावसामुळे सकाळी दव पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कपाशी पीक, केळी, संत्रा या पिकांवर होतो. या महिन्यात पडणारे दव काही प्रमाणात तारक तर, काही वेळा ते पिकासाठी धोक्याचे असते, असे शेतकरी सांगतात. भरलेले पीक पाहून या वर्षी एकरी पंधरा क्विंटल कापूस मिळण्याची आशा शेतकऱ्यांना होती. शिवाय, कर्ज फेडही करता येईल, असाही विचार त्यांच्या मनात होता. मात्र मागील काही दिवसांपासून पिकाला लागलेल्या ग्रहणामुळे खर्च निघणे कठीण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे जिल्ह्यात केळी पिकाच्या झाडांची वाढ खुंटली. तर, संत्र्याच्या बागांमध्ये लागलेली संत्रीही गळून पडत आहेत.
यंदा कापूस बाजारपेठेत विकायला नेण्याच्या वेळेत देशात कोरोनाने शिरकाव केला होता. त्यामुळे काही दिवस बाजारपेठा बंद होत्या. यादरम्यान शासकीय कापूस खरेदीही लांबली होती. त्याचाच फायदा घेत खासगी व्यापार्यांनी मनमानी दराने कापसाची खरेदी केली. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला समोर जावे लागले. त्यात आता अतिपावसामुळे कपाशी पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण झाल्याने भविष्यात कपाशी पीक घ्यावे की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
हेही वाचा - चहा एके चहा.. चहाप्रेमींनो प्रसिद्ध हिमाचलमधील कांगडा चहाबद्दल हे माहिती आहे का..