अमरावती- जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात येणाऱ्या परसापूर गावातील 42 वर्षीय व्यक्तीचा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. या व्यक्तीला उपचारासाठी दोन दिवसांपूर्वीच परसापूर येथून नागपूरला हलविण्यात आले होते.
परसापूर येथील व्यक्ती कर्करोगाने ग्रस्त होता. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. या व्यक्तीला दाखल करून घेताच नागपूर येथील शासकीय रुग्णालयात त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. रविवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मृत व्यक्ती हा कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट होताच रविवारी वैद्यकीय पथक परसापूर येथे दाखल झाले. या पथकाने कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या नातेवाईकांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या 14 व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. परसापूर गावाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.