अमरावती- दिल्ली येथे आयोजित तबलिघी जमात मरकझमध्ये सहभागी झालेला वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील कोरोनाबाधित रुग्ण बडनेरा जुनी वस्ती परिसरातील तीन मशिदीत काही दिवस वास्तव्याला होता. यावेळी त्याच्या संपर्कात आलेल्या काही लोकांना शुक्रवारी पोलिसांनी पकडून तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. ही माहिती समोर आल्यामुळे अमरावती शहरात प्रचंड खळबळ उडाली.
वाशिम जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर येताच अवघ्या काही तासात सदर रुग्णाचा इतिहास तपासण्यात आला. दरम्यान, हा कोरोना रुग्ण बडनेरा जुनी वस्ती परिसरात अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या तीन मशिदीत काही दिवस राहिला असल्याची माहिती समोर आली.
वाशिम पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या बडनेरा जुनी वस्ती परिसरातील काही लोकांना पकडून अमरावतीतील पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी आणले. या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या घटनेमुळे बडनेरा जुनी वस्ती परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अमरावती शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.