अमरावती - डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय (पीडीएमएमसी) येथील रुग्णालयात कोरोनाच्या संकट काळात सेवा देणाऱ्या परिचरिकांना तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे मंगळवारी या परिचारिकांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने रुग्णायात खळबळ उडाली.
कोरोनाच्या काळात हव्या त्या कुठल्याही सुविधा उपलब्ध नसताना पीडिएमएमसी येथील परिचारिकांनी विपरीत परिस्थितीत रुग्णसेवा केली. गंभीर बाब म्हणजे याठिकाणी असणाऱ्या विलगीकरण कक्षातही या परिचारिकांनी सेवा दिली. मात्र, त्यांना पीपीई किट, 14 दिवसांचे क्वारंटाईन अशा कुठल्याही सुविधा दिल्या नाहीत. 24 तास सेवा द्यायला लावून या परिचारिकांची जेवणाची सोय सुद्धा रुग्णालय प्रशासनाने केली नाही. या परिचारिकांमध्ये काही कंत्राटी, काही शिकाऊ आणि काही कायमस्वरुपी आहेत. यापैकी कोणालाही तीन महिन्यांपासून वेतन मिळले नाही. आम्हाला 11 हजार रुपये वेतन मिळेल, असे कागदोपत्री नमूद असता आमच्या हातात 8 हजार रुपयेच ठेवले जातात, असा आरोपही संतप्त परिचारिकांनी केला.
दरम्यान, सध्या कोरोनामुळे संस्था अडचणीत आहे. महाविद्यालयात एप्रिल-मे महिन्यात होणारे विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. शासनाने अद्याप शिष्यवृत्तीचे पैसे दिले नाही. त्यामुळेही आर्थिक अडचण असल्यामुळे परिचारिकांसोबतच अनेकांचे वेतन रखडले आहे. यावर लवकरच तोडगा निघेल, असे महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. पद्माकर सोमवंशी म्हणाले.