अमरावती - पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. मात्र, शनिवारी प्रदीर्घ प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने आता जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 31.6 मि.मी. पाऊस बरसला असून जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे.
सध्या जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू झाल्याने संपूर्ण वातावरण चिंब झाले आहे. पाऊस नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सध्या काहीसा दिलासा मिळाला असून पावसामुळे नदी, नाले, तलावांची पातळी वाढायला लागली आहे.
अमरावती तालुक्यात 24 तासात 26 मि. मी. पाऊस बरसला आहे. भातकुली तालुक्यात 23.1 मि.मी, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 31 मि.मी, चांदुर रेल्वे तालुक्यात 24.1 मि.मी, धामणगाव रेल्वे तालुक्यात 31 मि.मी, तिवसा तालुक्यात 36.6 मि.मी, मोर्शी तालुक्यात 47.7 मि.मी, वरुड तालुक्यात 39.9 मि.मी, अचलपूर तालुक्यात 26.5 मि.मी, चांदुर बाजार तालुक्यात 39.6 मि.मी, दर्यापूर तालुक्यात 24.8 मि.मी, अंजनगाव तालुक्यात 12.5 मि.मी, धारणी तालुक्यात 22.3 मि.मी आणि चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक 57.5 मि.मी पाऊस बरसला आहे.