अमरावती : शहर कोतवाली पोलीस ठाण्यालगतच असणाऱ्या ज्येष्ठ चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला बुधवारी सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झेंडा लागला, असल्याचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ता समीर जवंजाळ यांच्या लक्षात आले. त्यांनी गांधीजीच्या पुतळ्याला लागलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या झेंड्याचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. तसेच याबाबत शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी ही तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.
मध्यरात्री काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला निषेध : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झेंडा लावण्यात आल्याची माहिती सर्वत्र पसरली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास युवक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने जयस्तंभ चौक येथे एकत्रित आले. यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह अमरावती पोलिसांचा निषेध नोंदवला. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या दबावाखाली आता अमरावती पोलीस देखील काम करीत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी भैय्या पवार यांनी केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना 9 जुलै 1949 ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली. ज्ञानशील आणि एकता हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ब्रीद वाक्य आहे.
महत्त्व कधीही कळू शकणार नाही : जगातला सर्वात मोठा संघटन असल्याचा दावा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करीत आहे. मात्र आता त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आपला झेंडा लावण्याची वेळ येते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महात्मा गांधींच्या पुतळ्याला त्यांचा झेंडा लावण्याऐवजी तिरंगा लावला असता, तर आम्ही त्याचे स्वागत केले असते असे काँग्रेसचे पदाधिकारी वैभव वानखडे यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्य चळवळीत कुठलाही वाटा नसणाऱ्या संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला महात्मा गांधी किंवा भगतसिंग राजगुरू यांचे महत्त्व कधीही कळू शकणार नाही, असा आरोप देखील वैभव वानखडे यांनी केला. या संपूर्ण प्रकाराचा आम्ही निषेध नोंदवतो. तसेच पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असा प्रकार घडला आहे. तरीही पोलीस कुठलीही कारवाई करीत नाही, याचा आम्ही निषेध नोंदवतो असे देखील वैभव वानखडे म्हणाले.
एबीव्हीपीनेही केली कारवाईची मागणी : दरम्यान जयस्तंभ चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झेंडा लावण्यामागे नेमके कोण आहेत? याबाबत चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने देखील करण्यात आली आहे. तसे पत्रक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज पहाटे काढले आहे. याप्रकरणी एबीव्हीपीनेही कारवाईची मागणी केली आहे.