अमरावती - लॉकडाऊनमुळे भटक्या जनावरांची परिस्थिती वाईट झाली आहे. यामुळे या जनावरांना जगता यावे यासाठी मोर्शी येथील सामाजिक कार्यकर्ते जगदीश जयस्वाल हे रोज आपल्या गाडीत गुरांसाठी चारा आणि भटक्या कुत्र्यांसाठी ब्रेड व इतर साहित्य घेऊन जातात.
गेल्या महिन्याभरापासून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांची अवस्था वाईट झाली आहे. गावात मजुरीचे कामे पूर्ण पणे बंद असल्यामुळे आपलेच पोट भरता येत नाही. तर घरी असलेल्या जनावरांचे पोट कसे भरावे, म्हणून अनेक लोकांनी आपली जनावरे मोकाट सोडून दिली आहे. तालुक्यातील हॉटेलही बंद असल्याने भटक्या श्वानांचेही जगणे कठीण झाले आहे.
हेही वाचा - दीडशे वर्षांच्या काळात प्रथमच जळगावातील सराफा बाजार अक्षय्यतृतीयेला राहणार बंद!
जिथे जिथे रस्त्यावर ही जनावरे दिसेल त्याठिकाणी जयस्वाल या जनावरांना चारा खाऊ घालतात. जोपर्यंत लॉकडाऊन आहे, तोपर्यंत या भटक्या जनावरांची व मोकाट गायी वासरांची पोषण आपण करणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचे मोर्शी तालुक्यात कौतुक होत आहे.