अमरावती - महिला बालकल्याण विभागामार्फत गर्भवती मातांना व मुलांना पोषण आहारामध्ये निकृष्ट दर्जाचा चणा दिला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केला. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे तक्रार केली. तसेच, तळणी येथील लाभार्थी अंकुश सीलसकर यांनी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी पोलीस ठाण्यात महिला व बालकल्याणमंत्री, मंत्रालय सचिव व कंपनी विरुद्ध मोर्शी पोलिसात तक्रार दाखल केली.
तथापि, यावर महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा किसान मोर्चाचे नेते अनिल बोंडे यांच्यावर त्यांनी टीका केली. बोंडे यांना माझ्याविरुद्ध काहीच सापडत नसून त्यांच्याच भाजपा सरकारमधील हे ठेकेदार आहेत. यात जो दोषी असेल त्याला जेलमध्ये टाकू, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. या प्रकरणी सध्या चौकशी सुरू असून पोलिसांनी तहसीलच्या पुरवठा विभागाला पत्र लिहिले आहे.