अमरावती - शहरात लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविद्यालयाला मंजूरी दिली असल्याची माहिती भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण पातूरकर यांनी दिली. विभागीय मुख्यालय असणाऱ्या अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी किरण पातुरकर यांच्या नेतृत्वात कृती समितीने आंदोलन छेडले होते. या आंदोलनाल यश आले असल्याचे त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
अकोला, यवतमाळ सारख्या शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्यात आले असताना विभागीय शहर असणाऱ्या अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसणे ही बाब खटकणारी होती. तेव्हा किरण पातूरकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या माध्यमातून मागील २ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या चळवळीला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत गेला. दिवसेंदिवस या आंदोलनाला अमरावतीकरांचा पाठिंबा वाढला. सर्व पक्षीय मेळावे, विविध सामाजिक, औद्योगिक, व्यापारी, क्रीडा, महिला संघटना, एमआयडीसी असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, चेंबर ऑफ कॉमर्स आशा दोनशे संघटनांचा पाठिंबा या आंदोलनाला मिळाला होता.
महत्वाचे म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अमरावती महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेनेही प्रस्ताव पारित केला होता. नवनियुक्त मंत्री डॉ. अनिल बोंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार रवी राणा, आमदार वीरेंद्र जगताप आशा सर्वपक्षीय नेत्यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले. असल्याची माहिती किरण पातूरकर दिली. हे अमरावतीकरांच्या प्रयत्नांचे फलित असल्याचेही पातूरकर यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला डॉ. अशोक लांडे, डॉ. बबन बेलसरे, मोनिका उमक, सुरेश जैन, पूजा जोशी, श्रीकांत राठी आदी मान्यवर उपस्थित होते.