अमरावती - मागील तीन चार दिवसांपासून विदर्भात ढगाळ वातावरणामुळे थंडीची लाट पसरली आहे. त्यातच काल आलेल्या अवकाळी पावसामुळे तूर ,कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यातील तिवसा, चांदूर बाजार, अमरावती, परतवाडा, धारणीसह आदी तालुक्यातील पिकांना याचा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
हेही वाचा- कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवारांनी दिली मानवंदना
सध्या शेतकऱ्यांच्या शेतात खरीप हंगामातील कपाशी आणि तुरीचे पीक उभे आहे. परंतु, तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात असलेले ढगाळ वातावरण, थंडीची लाट यामुळे तुरीला हे वातावरण हानीकारक असून तुरीवर आळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर हिरव्या शेंगा अचानक वाळू लागल्या आहेत. कपाशी पिकाला या पावसाचा जबर फटका बसला आहे. कापूस पावसाने ओला झाल्यामुळे पिवळा पडत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत. जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व थंडीची लाट असल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत.