अमरावती - जगात सगळीकडे कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. देशासह महाराष्ट्र आणि त्यानंतर विदर्भातही या रोगाचे रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यासह गावखेड्यातही या आजाराविषयी जनजागृती व काळजी घेणे सुरू आहे. अशातच चांदूर रेल्वे तालुक्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयात एकच गर्दी आहे. त्यामुळे खबरदारी म्हणुन चांदूर रेल्वेचे तहसिलदार राजेंद्र इंगळे यांच्या पुढाकाराने तहसिल कार्यालयात डेटॉल व फिनाईलची फवारणी कर्मचाऱ्यांनी केली असुन आता कार्यालयात जागोजागी हँडवॉशही ठेवले जाणार आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीची गडबड सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज छाननी, अर्ज मागे घेणे, चिन्ह वाटप करणे याकरीता उमेदवार व समर्थकांची तहसिल कार्यालयात गर्दी होणार आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती व तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आलेले पाहायला मिळाले. परंतु या सर्व धामधुमीच्या बाजूलाच संपूर्ण देशभरात व जगात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. याला रोखण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना आखत शासनाने सर्व यात्रा व शासनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. एवढेच नव्हे तर एका ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन ही शासनाच्या वतीने होत आहे. तर, ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुशंगाने होणाऱ्या गर्दीवर उपाय योजनेसाठी चांदूर रेल्वे येथील तहसिल कार्यालयात रविवारी डेटॉल व फिनाईलची फवारणी कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी तहसिलदार राजेंद्र इंगळे यांचीही उपस्थिती होती. तर, आता तहसिल कार्यालयात जागोजागी हँडवॉश सुध्दा लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - कोरोनाची धास्ती : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय 31 मार्च पर्यंत बंद; खबरदारीचे आवाहन
हेही वाचा - शासनाच्या आदेशाला निवडणूक विभागानेच दाखवली केराची टोपली