अमरावती - जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन या सर्व मशीन तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय रुग्णालयात अनेक महत्वाच्या औषधांचा तुटवडादेखील आहे. चोपडीच्या आमदार सुलभा खोडके यांनी आज (2 जानेवारी) जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी, रुग्णालयातील अडचणींसंदर्भात त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. मात्र, रुग्णालयात सुविधा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांची एकूण 22 पदे असून यापैकी 15 पदे अद्यापही रिक्त आहेत. त्यामुळे, केवळ सात वैद्यकीय अधिकाऱ्यांवर रुग्णालयाची जबाबदारी असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, यशोमती ठाकूर यांचे आदेश
जिल्हा सामान्य रुग्णालय आणि सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल मिळून एकूण साडेसातशे खाटांची आवश्यकता असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्याम सुंदर निकम यांनी यावेळी खोडके यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्ह्यात रुग्णसेवा अद्ययावत व्हावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव त्वरित मार्गी लागायला हवा, अशी अपेक्षाही डॉ. शामसुंदर यांनी व्यक्त केली.
आमदार सुलभा खोडके यांनी शासनस्तरावर शहरातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी म्हटले आहे. याशिवाय, वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रुग्णांना अडचण येणार नाही. यासाठी प्रयत्न करावे, असेही त्या म्हणाल्या. या बैठकीला विलास इंगोले, किशोर शेळके, चलन जित्कर नंदा, या माजी महापौरांसह महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत तसेच काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.