अमरावती - आधी आम्ही पोटाची भूक भागवण्यासाठी रेल्वे स्थानकावर भीक मागत होतो. पण, आमचे मतीन सर म्हणायचे, भीक मागू नको, आमच्या 'प्रश्नचिन्ह' शाळेत शिक अन् मोठा अधिकारी होय. पण, आज हीच आमची शाळा समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पाडली जाणार आहे. मुख्यमंत्रीसाहेब, आम्ही आधी पोटासाठी भीक मागत होतो. मात्र, आता तुमच्या समृद्धी महामार्गासाठी आमची शाळा पाडू नये म्हणून भीक मागतो, अशी आर्त हाक अमरावती जिल्ह्यातील 'प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेतील' विद्यार्थ्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे.
अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील फासेपारधी समाजातील मतीन भोसले यांनी जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा देऊन. फासेपारधी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रक्ताचे पाणी करत मोठा संघर्षं केला. एका छोट्या कुडाच्या झोपडीपासून सुरू झालेली प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेने आज अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्वल केले.
खरंतर शाळेचे नावच प्रश्नचिन्ह असल्याने अनेकांच्या मनामध्ये या शाळेबद्दल अनेक प्रश्न उभे राहिले होते. परंतु फासेपारधी समाजातील मुलांची अवस्था पाहता त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी मतीन भोसले यांनी केलेल्या प्रयत्नामुळे अनेक सामाजिक लोकांनी या शाळेला भक्कम पाठबळ दिले. रेल्वे स्थानक, मंदिर, बस स्थानक, फुटफाथ अशा विविध वर्दळीच्या ठिकाणी भीक मागून पोटाची खळगी भरणाऱ्या फासेपारधी समाजातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून 2013 मध्ये 117 विद्यार्थ्यांवर या शाळेची मुहूर्त मेढ रोवली.
बघता बघता आज महाराष्ट्रातील चारशेपेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक करत शाळेचे नाव उंचीवर नेले. अनेक पुरस्कार प्रदान विद्यार्थी या प्रश्नचिन्ह शाळेत पाहायला मिळतात. परंतु, आता येथील विद्यार्थ्यांना वेगळीच चिंता सतावू लागली आहे. कारण फूटपाथवरून शिक्षणाच्या प्रवाहात वाहून नेणाऱ्या या शाळेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गामुळे बुलडोजर चालणार आहे. रोज पोटभर जेवण मिळण्यासाठी परिस्थितीशी झगडणाऱ्या या पारधी समाजातील मुलांपुढे कसे शिक्षण घ्यावे, असा यक्ष प्रश्न उपस्थित झाला आहे.
बाराही महिने चालणारी शाळा आज ओस पडली आहे. पालक आपल्या विद्यार्थ्यांना घरी घेऊन गेले आहे. समृद्धी महामार्ग मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने आता थेट मुख्यमंत्र्यांनाच शाळा वाचवण्याची भीक हे विद्यार्थी मागत आहे.
या शाळेसाठी खूप संघर्ष केला. शून्यातून एवढे साकारले, मेहनत घ्यावी लागली. परंतु ही शाळा विकासाच्या नावाखाली पाडली जात असेल तर सर्वात मोठे दुःख मला होणार आहे. मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पण पुनर्वसनाचे आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. लवकर तोडगा निघाला नाही तर, जून महिन्यात या चिमुकल्या विद्यार्थ्यांसह मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचे शाळा संस्थापक मतीन भोसले म्हणाले. विकास हा झालाच पाहिजे, या समृध्दी महामार्गाने समृद्धी नांदेलही पण, या विद्यार्थ्यांची शाळा जर समृद्धीच्या नावाखाली गेली. तर या विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक भविष्याचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असेही भोसले म्हणाले.