अमरावती - जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सतावत असलेल्या कुपोषणाच्या समस्येवर आळा बसावा, यासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात बाल अतिदक्षता विभाग (NRC) सुरू करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कुपोषणाची समस्या आदिवासी बांधवांच्या मुलांच्या पाचविलाच पुजली आहे. मेळघाटातील कुपोषणाची समस्या सुटावी यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र, ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यावर आळा बसावा, म्हणून हा बाल अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे.
या अतिदक्षता विभागात अति तीव्र कुपोषित चिमुकल्या बालकांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढून सुदृढ करण्याचा प्रयत्न येथील वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केला जात आहे.
या विभागात आतापर्यंत ३०२ बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यांना कुपोषण श्रेणीतून बाहेर काढून जीवदान देण्यात यश आले आहे. या अत्याधुनिक सेवेचा सर्व मेळघाटवासीयांनी लाभ घ्यावा आणि कुपोषणावर मात करावी, असे आव्हान उपजिल्हा रुग्णालयाद्वारे करण्यात आले आहे.