अमरावती - राज्य सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधामध्ये मोठया प्रमाणावर शिथिलता दिली आहे. त्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. आज पासून पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद घेता येणार आहे. शिवाय चिखलदरा पर्यटन स्थळ, सीमांडोह आणि कोलकास येथील पर्यटनही आजपासून कोरोना नियम पाळून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी पर्यटकांनी मात्र लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. शाळा-महाविद्यालया संदर्भात अद्यापही कोणताही निर्णय झाला नसला तरी या आठवड्याच्या अखेरीस कोरोना रुग्णांचा दर कमी झाल्यानंतर शाळा महाविद्यालय सुरू करण्याबाबत पुनर्विचार केला जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
विदर्भाच काश्मीर म्हणून अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पर्यटन स्थळाची ओळख आहे. दरवर्षी राज्यभरातील हजारो पर्यटन इथं भेट देत असतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निर्बंधामूळे अनेकदा चिखलदरामधील पर्यटन हे बंद करण्यात आले होते. त्यातच पर्यटनावर येथील नागरिकांचा उदरनिर्वाह असल्याने याचा मोठा फटका या पर्यटन नगरीला बसला. दरम्यान आता पर्यटन सुरू झाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
स्पासेंटर 50 टक्के क्षमतेने सुरू -
कोरोना नियमांमध्ये जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर शिथिलता दिली आहे. त्यामुळे अमरावती शहरातील स्पा सेंटर हे आज पासून उघडणार आहे. यामध्ये 50 टक्के क्षमतेने व कोरोनाचे सर्व नियम पाळून हे स्पा सेंटर व्यवसायिकांना सुरू करावे लागणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी दिली.
अंत्ययात्रेत नातेवाईकांच्या संख्येची मर्यादा हटवली -
कोरोनामुळे लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत, अंत्ययात्रेला होणारी गर्दी यावर जिल्हा प्रशासनाने निर्बंध लादले होते. परंतु, आता कोरोनाची लाट ओसरत असल्यामुळे आता पूर्वीच्या निर्बंधामुधे शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता अंत्ययात्रेला उपस्थित राहणाऱ्या लोकांची मर्यादा हटवली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे -
नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. तसेच ज्या नागरिकांनी लसीकरण केले नाही, अशा लोकांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे. कोविडबाधितांची संख्या अद्यापही मोठी आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड अनुरूप वर्तवणूक करावी. ज्यांचे अद्यापही लसीकरण झाले नाही, किंवा दुसरी मात्रा झाली नसेल, त्यांनी ते करून घ्यावे. तसेच 50 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनीही लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेणे प्रशासनाला सुलभ होईल. बुस्टर डोसही फ्रंटलाईन वर्कर्स, कोमॉर्बिड व ज्येष्ठांना देण्यात येत आहे. त्यानुसार संबंधितांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - India Corona Update: 24 तासात 1 लाख 61 हजार 386 नवीन कोरोना रुग्ण, 1,733 मृत्यू