अमरावती - चांदूर रेल्वे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आठ दिवसानंतर पुन्हा सुरू करण्यात आली असून यानंतर शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. रोज एक हजार पोत्यांची तुरीची आवक बाजारात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे पालन करत बाजार समित्यांमधील व्यवहार सुरू झाले आहेत. मागील महिन्यात तुरळक आवक होती. मात्र, मे महिन्यात मात्र बाजार समितीतील मालाची आवक वाढलीय. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या खरीप हंगामाचा अंदाज घेत शेतकरी साठवलेला माल देखील विक्रीसाठी आणत आहेत. कोरोनाच्या धाकाने चांदूर रेल्वे बाजार समितीकडून आवश्यक खबरदारी देखील घेण्यात येत आहे. तुरीला सर्वसाधारण 5 हजार भाव मिळत असल्याचे चित्र आहे.
मात्र, सध्या बाजार समितीत शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या कमी असल्याने दोन किंवा तीन व्यापाऱ्यांमध्येच लिलाव होत आहेत. बाजार समितीत सकाळी 11 पर्यंतच माल घेत असल्याने शेतकरी सकाळीच माल घेऊन दाखल होत आहेत. तर बाजार समितीच्या आवारात सोशल डिस्टन्सचे पालन करण्यासाठी मोजक्याच शेतकऱ्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे.