अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी बँकेत येताना गर्दी करू नये, त्यांच्यात सुरक्षित अंतर राहावे यासाठी बँकेच्या बाहेर सुरक्षित अंतर ठेऊन गोल आखण्यात आले, जेणेकरूण लोकांनी यात उभे राहून खबरदारी घ्यावी. पण, नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकत त्या गोलांमध्ये कुणी चप्पल ठेवले, कुणी पासबुक तर कुणी थैल्या आणि आपण मात्र, झाडाच्या सावलीत उभे राहून गप्पा-टप्पा केल्या सुरू केल्या. त्यामुळे सुरक्षित अंतर राखण्याचे काम जणू यांनी चप्पल, पासबुक, थैल्यांना दिल्याचे हास्यास्पद चित्र दिसून आले.
लॉकडाऊन दरम्यान लोकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारने गरिबांच्या जनधन खात्यात पैसे पाठवले आहेत. दरम्यान, आता ही रक्कम बँकेतून काढण्यासाठी मोठी गर्दी जमा होत आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील बँक ऑफ इंडियाच्या समोर असा प्रकार निदर्शनास आला.
बँकेत होणारी गर्दी पाहता स्थानिक प्रशासनाकडून बँक व्यवस्थापकांना ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून निर्देश दिले होते. यामध्ये बँकेबाहेर पेंडॉल किंवा ग्रीन नेट टाकण्याच्या सूचना बँकेला दिल्या होत्या. परंतु, याचे पालन होताना दिसत नाही. बँक सुरू होण्यापूर्वीच ग्राहकांची बँकेबाहेर गर्दी पहावयास मिळत आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील बँक ऑफ इंडिया समोर कडक ऊन टाळण्यासाठी ग्राहक त्यांच्या चप्पल, थैल्या, पासबुक, नावाच्या चिठ्ठ्या या त्या गोलात ठेऊन सावलीत बसल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्याचवेळी काही लोक सावलीत बसून एकत्र गप्पा मारतानाही दिसले. बँक सुरू होताच आणि नंतरही बँकेबाहेर मोठी रांग लागली होती. मात्र, उन्हात ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून बँकेतर्फे योग्य ती व्यवस्था करणे गरजेचे आहे.