अमरावती - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी 'पुन्हा पुन्हा तुम्हाले मी संगनार नाही, घरा बाहेर निगाचं नाही म्हणजे नाही' असे आवाहन विदर्भातील कलावंतांनी केले आहे. विदर्भातील कलाकारांनी जनजगृतीसाठी तयार केलेल्या या चित्रफितीने धमाल उडवली आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच बसून आहेत. तरीही काही नागरिक बाहेर फिरतात. अशा बाहेर फिरणाऱ्या आणि इतरही नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन अमरावतीच्या काही हुरहुन्नरी कलाकारांनी केले आहे. कोरोनासारख्या संकटाला तोंड देण्यासाठी घरी बसणे हाच योग्य उपाय आहे, हा संदेश देणारा एक म्युझिक व्हिडिओ त्यांनी तयार केला आहे. यात भारत गणेशपुरे, अंकुर वाढवे, शशांक उदापुरकर, वर्षा दांडळे, रसिका धामणकर, श्रीनिवास पोकळे या सारख्या कलाकारांनी नागरिकांना घरातच बसा, असा संदेश दिला आहे.
व्हिडिओची संकल्पना साद परिवाराची असून गीत कुंजन वंदे यांचे आहे. संगीत श्याम क्षीरसागर, संकलन विवेक चक्रे, साउंड मिक्सिंग यतीन उल्लाळ यांचे असून निर्मिती विशाल खिरे आणि दिग्दर्शन विशाल फाटे यांनी केले आहे.