अमरावती - येथे भाजपचे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गाडगे नगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात राज्य शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले होते.
शुक्रवारी माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी राज्य शासनाविरोधात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन केले होते. यावेळी भाजपच्या ग्रामीण अध्यक्ष निवेदिता दिघडे, यासुद्धा उपस्थित होत्या. भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला होता. या सोबतच, काळा कापड असलेल्या कापसाची उशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रतिकात्मक भेट दिली होती. याप्रकरणी माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यासह 6 जणांविरुद्ध अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी विविध कलमानव्ये गुन्हे दाखल केले आहेत.