अमरावती - अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या राज्याच्या महिला ब बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी या गावाच्या सरपंचपदी लढा संघटनेच्या सरपंचांची निवड झाली आहे. यासंघटनेला भाजप आणि कम्यूनिस्ट पक्षाचे समर्थन होते. त्यामुळे 'गड आला, पण सिंह गेला', अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोझरी ग्रामपंचायच्या निवडणुकीत १३ पैकी तबल ७ उमेदवार हे मंत्री यशोमती ठाकूर यांच्या गटाचे निवडून आले होते. त्यानंतर आज सरपंच पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत लढा संघटनेचे सुरेंद्र भिवगडे हे ईश्वर चिठ्ठीने सरपंच झाले. तर उपसरपंचपदी काँग्रेसच्या गटाचे प्रशांत प्रधान हे विराजमान झाले आहे.
सदस्यांनी गुप्त मतदानाची केली होती मागणी -
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी गाव हे मंत्री यशोमती ठाकूर यांचे गाव आहे. मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतवर काँग्रेसची सत्ता आहे. यंदा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत १३ पैकी ७ उमेदवार हे काँग्रेसचे निवडणूक आले होते. तर एकूण ६ अपक्ष निवडून आले होते. आज पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत कॉग्रेसडून गजानन तडस व गणेश गायकवाड यांनी अर्ज दाखल केला होता. तर अपक्ष उमेदवारमधून 'लढा'चे सुरेंद्र भिवगडे, संजय लांडे आणि शुभांगी गहुकर यांनी अर्ज दाखल केला होता. वेळेपर्यंत कुणीही अर्ज मागे न घेतल्याने काही सदस्यांनी गुप्त मतदानाची मागणी केली होती.
ईश्वर चिठ्ठीने सरपंचाची निवड -
यामध्ये काँग्रेस गटाच्या गजानन तडस यांना 5 मते, तर गणेश गायकवाड यांना 2 मते मिळाली. तसेच अपक्ष उमेदवारांपैकी सुरेंद्र भिवगडे यांना 5 मते, संजय लांडे यांना 1 मत मिळाले. त्यामुळे काँग्रेसचे गजानन तडस व लढा संघटनेचे सुरेंद्र भिवगडे यांना सारखी मते मिळाल्याने अखेर ईश्वर चिठ्ठीतून सरपंच पदाची निवड करण्यात आली. यामध्ये सुरेंद्र भिवगडे हे विजयी झाले. तर उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस गटाचे प्रशांत प्रधान, तर अपक्षमधून मनोज लांजेवार हे निवडणूक रिंगणात होते. यात प्रशांत प्रधान यांना ८ मते मिळाल्याने ते विजयी झाले.
तर सत्ता मिळवता आली असती -
काँग्रेसच्या गोटातून गजानन तडस व गणेश गायकवाड हे सरपंच पदासाठी इच्छुक होते. त्यातच कॉंग्रेसला येथे स्पष्ट बहुमत सुद्धा होते. परंतु एकाच गटाचे दोन उमेदवार रिंगणात असल्याने व कुणीच माघार न घेतल्याने याचा फायदा हा सुरेंद्र भिवगडे यांना झाला.
हेही वाचा - नागपुरात पुन्हा होऊ शकतो कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवसात ५०० रुग्ण आढळल्याने चिंता