अमरावती - विधानपरिषद निवडणुकीत बसपच्या नगरसेवकांनी पैसे घेऊन भाजपच्या प्रवीण पोटे यांना मतदान केले तसेच लोकसभा निवडणुकीतही कार्यकर्त्यांना अंधारात ठेऊन नेत्यांनी पैसे खाल्ल्याचा आरोप करत आज बसपाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रदेश प्रभारी अॅड. संदीप ताजणे यांना मारहाण केली. या घटनेमुळे येथील शासकीय विश्रामभवनात एकच खळबळ उडाली.
शासकीय विश्राम भवन येथे बहुजन समाज पक्षाची लोकसभा निवडणूक समीक्षा बैठक आयोजित करण्यात आली होती. निवडणूक प्रदेश प्रभारी अॅड. संदीप ताजणे, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव प्रमोद रैना, कृष्णा बेले, प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार उपस्थित होते. बैठक सुरू होताच अॅड. संदीप यांनी विधानपरिषद आणि लोकसभा निवडणुकीत पक्ष विकला, असा आरोप करीत कार्यकर्त्यांनी त्यांना खुर्च्या मारून फेकल्या. या घटनेमुळे बैठकीत गोंधळ उडाला. उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांना यावेळी चोप बसला. संदीप ताजणे यांच्यावर सर्वाधिक रोष असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना कपडे फाटेपर्यंत मारले.
कार्यकर्त्यांच्या गर्दीतून पळून जाऊन ताजणे यांनी स्वतः ला एका खोलीत बंद करून घेतले. यानंतर प्रमोद रैना, कृष्णा बेले, चेतन पवार यांनी शासकीय विश्रामभावनातून पळ काढला. दरम्यान संदीप ताजणे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांची नारेबाजी सुरू होती. घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक चोरमले यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या शीघ्र कृती दलाच्या सुरक्षा व्यवस्थेत संदीप ताजणे यांना विश्राम गृहाबाहेर सुखरूप काढणतात आले. यावेळी बसपच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला.