अमरावती - केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या आणि मोटारसायकलने दिल्लीला जाण्याची नौटंकी करणाऱ्या बच्चू कडू यांनी पहिले स्वतःच्या घरातील अंधार दूर करावा आणि स्वतःला सिद्ध केल्यानंतर इतरत्र उजेड पाडण्याची भाषा वापरावी, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
नौटंकी सम्राट म्हणून केला उल्लेख-
नौटंकी सम्राट बच्चू कडू ज्या खात्याचे मंत्री आहेत, त्या खात्याची एकही बैठक नाही. पश्चिम विदर्भ पुन्हा एकदा सिंचन अनुशेषग्रस्त झाला आहे. सिंचनाचा अनुशेष दूर करण्याच्या लढ्याला बच्चू कडू यांनी मूठमाती दिली आहे. त्यांच्या स्वतःच्या अचलपूर मतदारसंघातील सर्व सिंचन प्रकल्प ठप्प पडले आहेत. यावर चकार शब्द न काढणारे आणि राज्यात मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी ठरलेले बच्चू कडू प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मोटारसायकलने दिल्लीला जाण्याची नौटंकी करीत आहेत. शेतकऱ्यांची दुरवस्था रोखण्यासाठी बच्चू कडू यांनी पश्चिम विदर्भातील ठप्प असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करावे. हिंमत असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांशी दोन हात करून ते पळवून नेत असलेला विदर्भाचा निधी थांबवून दाखवावा, असे आव्हान शिवराय कुळकर्णी यांनी दिले आहे.
मेळघाटातील गडगा प्रकल्प 150 कोटीहून 450 कोटीहून पोहचला. राणापिसा आणि हिराबंबई प्रकल्प ठप्प आहे. मेळघाटात बच्चू कडूच्या प्रहार संघटनेचा आमदार आहे. मात्र, हे प्रकल्प ठप्प आहेत. पेढी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी भूखंडाचे वाटप होऊन वर्ष झाले मात्र, नागरी सुविधांची कामे झालेली नाही. तेव्हापासून महत्वाकांक्षी पेढी प्रकल्प ठप्प आहे. बच्चू कडूंच्या बेलोरा या स्वतःच्या गावचा सिंचन प्रकल्प रखडला आहे. त्यांच्या मतदारसंघातील पांढरी, बोरडी, वासनी, राजुरा सर्व प्रकल्प कुलूपबंद आहेत. बच्चू कडू पालकमंत्री असलेल्या उमा बॅरेज, नेर धामना, पूर्णा बॅरेज, नया अंदुरा हे प्रकल्प बंद पडले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात लोवर पैनगंगा आणि खर्डा तर बुलढाणा जिल्ह्यात जिगाव प्रकल्पाचे काम थांबले आहे. शाश्वत पाणी साठा हीच खरी शेतकऱ्यांची पुंजी आहे. शेतकऱ्यांचा कळवळा दाखवण्यासाठी नौटंकी करणारे बच्चू कडू पश्चिम विदर्भाचा अनुशेष वाढत असताना राज्याच्या मंत्री मंडळात मूग गिळून गप्प बसले आहेत. अनुशेषग्रस्त विदर्भातील शेतकऱ्याची दुरवस्था असताना त्यांच्या बांधा पर्यंत पाणी पोहचवण्याची नैतिक जबाबदारी बच्चू कडू यांची आहे. सिंचन प्रकल्पांची कामे ठप्प असल्याने आणि मंत्र्यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने विदर्भातील पैसा पश्चिम महाराष्ट्रात वळता केला जातो, त्या विरोधात चकार शब्द काढण्याची बच्चू कडू यांची हिंमत नाही. मिळालेला मंत्रीपदाचा तुकडा जपण्यासाठी लाचारी पत्करणारे बच्चू कडू घरातला अंधार दूर न करता दिल्लीत उजेड पाडायला निघाले असल्याची टीका शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
बच्चू कडूंनी नौटंकी थांबवावी -
अनुशेषासंदर्भात दांडेकर समितीच्या अहवालाव्दारे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये असलेला सिंचन विकास क्षेत्राचा अनुशेष निश्चित केला होता. शिल्लक असलेला 2,34,019 हेक्टर भौतिक अनुशेष दूर करण्यासाठी 102 प्रकल्पांचा समावेश असलेला “सिंचन अनुशेष निर्मूलन कार्यक्रम” राज्यपालांच्या सूचनेनुसार तयार करण्यात आला होता. याअनुशेष निर्मूलन कार्यक्रमातील 102 प्रकल्पांपैकी 55 प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित 45 प्रकल्प रखडले आहेत. हे पूर्णत्वास नेण्यासाठी बच्चू कडू यांनी उजेड पाडलेला नाही. हे प्रकल्प ठप्प असल्याने उर्वरित 1,60,766 हेक्टर अनुशेष कसा दूर होणार याचे उत्तर राज्यातील महाविकास आघाडीने दिले पाहिजे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही. कर्जमाफीचा लाभ नाही आणि बांधावर पाणी मिळावे यासाठी बच्चू कडू बोलत नाहीत. या पार्शवभूमीवर त्यांनी नौटंकी थांबवावी, असे शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -जगाला दिशा देणारा महामानव आपल्या राज्यात झाला याचा अभिमान - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हेही वाचा -पणन विभागाच्या अंतर्गत कृषी कायद्यातील येणाऱ्या मुद्यांना स्थगिती - बाळासाहेब पाटील