अमरावती - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बारवाले, हॉटेलवाले, दारुवाले यांचा कळवळा येतो. मात्र, शेतकऱ्यांसाठी यांचे काळीज का दुखत नाही, असा सवाल माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना केला आहे. कोरोनामूळे राज्यातील हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना करातून सूट द्यावी, अशी मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बोंडेंनी हा सवाल उपस्थित केला आहे.
राज्यात सुरू असलेल्या कडक निर्बंधामूळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यांचा शेतमाल विकला जात नाही, शेतकऱ्याला नुकसान भरपाईची गरज आहे. पण, त्यांना सरकार मदत करत नाही. सोयाबिन, कापूस नुकसानीचे पैसे अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, शेतकऱ्यांची वीज कापली, असे बोंडे म्हणाले.
या कोरोनाकाळात शेतकऱ्यांना फक्त पंतप्रधान किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये दर ४ महिन्याला त्यांच्या खात्यात आले. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही टाकली नाही. मागील कर्जमाफीही पूर्ण झाली नाही. कोरोनाच्या काळातील अवकाळीग्रस्तांचे कर्ज पुन्हा डोक्यावर आहे. या शासनाने कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण थांबवली यावर्षी बँका कर्ज भरल्याशिवाय कर्ज द्यायला तयार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचे आरोपीही बोंडे यांनी केले.
हेही वाचा - अमरावतीत लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड