अमरावती - कोरोनाच्या काळात वीज देयक माफ करणाऱ्यावरून राज्य शासनाने आता घुमजाव केला आहे. तसेच वीज कंपन्यांनी सर्वसामान्य जनतेकडून वीज देयकांच्या वसुलीचा सपाटा लावल्याने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याविरोधात भाजपतर्फे शहरातील विविध भागात असलेल्या वीज केंद्राला कुलूप लावत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान शहरातील सर्व वीज केंद्रांवर सकाळपासून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.
वीज केंद्रांना कुलूप ठोकण्याचा प्रयत्न -
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे आणि भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. तसेच रुख्मिणी नगर येथील वीज केंद्राला माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला. साई नगर येथील पटेल कॉलनी परिसरात असणाऱ्या वीज केंद्राला नगरसेवक तुषार भारतीय यांनी कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. मच्छिसाथ, लक्ष्मीनगर, गाडगेनगर, बडनेरा या भागातील वीज केंद्रांसमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह राज्य शासनाविरोधात घोषणा दिल्या.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त -
शहरातील विविध भागात असणाऱ्या वीज केंद्रांना कुलूप ठोकण्याचा इशारा भाजपने दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच वीज केंद्रांवर सकाळी 10 वाजल्यापासून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. या आंदोलनादेम्यान अमरावती शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.