अमरावती - गुरुवारी राज्यभरात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. अमरावतीतील शहरात शिवसेनेच्यावतीने मिरवणूक काढण्यात आली. शहरातील गांधी चौकातून ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या भव्य मिरवणुकीने शहरवासीयांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. विविध पक्षांच्या नेत्यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
शिवसेनेसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनेही शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. गांधी चौक येथे शिवसेना आणि मनसेच्या मिरवणुकी एकत्र आल्या. या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा - रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या विरोधात सासूची पोलिसांत तक्रार
गांधी चौक येथे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या मिरवणुकीत अनेक चिमुकले मावळे, शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत घोड्यावर स्वार होऊन सहभागी झाले. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांही मराठमोळ्या वेशभूषेत या मिरवणुकीत सहभागी झाल्या. जागोजागी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर फुलांची उधळण करण्यात आली.
माजी खासदार अनंत गुढे, शिवसेना शहर प्रमुख सुनील खराटे ,पराग गुडदे, दिनेश बुब, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वर्षा भोयर, मनीषा टेंबरे यांच्यासह काँग्रेसचे माजी महापौर विलास इंगोले, महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले.