अमरावती : ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये होणाऱ्या संवाद मेळव्यासाठी देशपातळीवरील मोठे पक्ष सामील होणार आहे. तेलंगणामध्ये संपूर्ण वीज आणि पाणी शंभर टक्के मोफत दिले जाते. प्रत्येक घरात नळ आणि पाणी दिल्या जाते. शेतकऱ्याला दहा हजार रुपये एकरी रब्बी आणि खरीप पिकासाठी अनुदान दिले जाते. तर उद्योगाकरिता उद्योजकाला कर्ज दिल्या जाते असे ज्ञानेश वाकुडकर यांनी म्हटले आहे. ते आज अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
शेतकऱ्यांचे सरकार देशांमध्ये यावे : शेतकऱ्यांचे सरकार यावे यासाठी भारत राष्ट्र समिती काम करत आहे. लवकरच 200 गाड्या दोनशे मतदार संघात फिरणार आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, बीजेपी, काँग्रेसचे नेते शेतकरी संघटनांसह अन्य पक्षाचे नेते प्रवेशासाठी भारत राष्ट्र समितिकडे येऊन गेले आहेत. येत्या पाच फेब्रुवारीला होणाऱ्या सभेला 25 हजार लोक जमणार वाकुडकरांनी सांगितले. कोरोना काळात शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्था जिवंत ठेवली. मात्र, त्यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
5 फेब्रुवारीला नांदेडला होणार संवाद मेळावा : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव येत्या ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये संवाद मेळावा घेणार आहेत. तेलंगणाबाहेर त्यांचा हा पहिलाच मेळावा असेल. बीआरएसच्या नेत्यांनी अमरावतीमध्ये आजी, माजी लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी घेऊन त्यांना बीआरएसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. मागील आठवड्यापासून तेलंगणातील विद्यमानसह माजी लोकप्रतिनिधी नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत.
गुरुद्वारा मैदानावर मेळावा : मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या संवाद मेळाव्याची जागा गुरुद्वारा मैदानावर निश्चित झाली आहे. या वेळी अनेकांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यानंतर पक्षाची जिल्हा, विभाग व राज्याची कार्यकारिणी ठरणार आहे, असे संयोजकांनी सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने प्रचार, प्रसार करणे तसेच समविचारी पक्षा सोबत एकत्र येऊन काम करणार असल्याचे वाकुडकर म्हणाले. त्याचप्रमाणे सामाजिक संघटना तसेच छोटे पक्ष यांनी एकत्र येऊन काम करावे याकरिता भारत राष्ट्र समितीची स्थापना झाल्याचे ज्ञानेश वाकुडकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रात प्रवेश : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची यापूर्वी नांदेडमध्ये सभा ही ठरली होती. मात्र, मराठवाडा विधान परिषदेच्या निवडणुका संदर्भात लावलेल्या आचारसंहितामुळे सभा रद्द करण्यात आली होती. पुन्हा एकदा बीआरएस ( भारत राष्ट्र समिती ) मोठ्या ताकतीने महाराष्ट्रात प्रवेश करत असून येत्या ५ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला प्रवीण गाढवे, प्राध्यापक देविदास आठवले, रविकांत खोब्रागडे, प्राध्यापक सूर्यकांत बाजड, उत्तम गवई, धनंजय तोटे उपस्थित होते.