मुंबई - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हनुमान चालीसा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातून जामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा प्रकरणानंतर खार पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला होता. राणा दाम्पत्याला 11 नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे निर्देश दिले असताना देखील हजर न झाल्याने अखेर आज जामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आले.
काय आहे प्रकरण सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यावरून राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्याच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला.
राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक संतप्त राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरूच होता. त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे राणा दाम्पत्याने व्हिडीओ जारी करीत सांगितले आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली.
मुंबई पोलिसांकडून राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली : पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. 13 दिवसानंतर त्यांना काही अटी व शर्तीवर मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी जाताना प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती.