अमरावती Bahiram Bua Yatra: सातपुडा पर्वत रांगेत उंच शिखरावर अकरावी करा स्वरूपात बहिरम बाबांची मूर्ती विराजमान आहे. (Bahiram Baba Temple) हजारो वर्षांपूर्वी अगदी सुपारीच्या आकाराची असणाऱ्या ह्या मूर्तीने कालांतराने आकराळ विक्राळ स्वरूप धारण केल्याचे बोलले जाते. या मूर्तीला लोणी आणि शेंदूर लावण्यात येतो. (Satpura Mountains)
अशी आहे आख्यायिका: सातपुडा पर्वत रांगेत असणाऱ्या सालबर्डी येथून शंकर आणि पार्वती दरवर्षी पंचमढीला जात असतात. या प्रवासात तीन दिवस त्यांचे बहिरम परिसरात वास्तव्य असते, अशी आख्यायिका आहे. या आख्यायिकेनुसार शंकराने पार्वतीच्या आंघोळीसाठी या भागात काशीच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तलाव बनविला होता. या तलावाचे नाव काशी तलाव असून हा तलाव आज देखील या परिसरात आहे. यासह शंकर आणि पार्वती आपल्या गणांसह या भागात मुक्कामाला असल्यामुळे त्यांच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी एका तलावातून भांडी बाहेर यायची. या तलावाला भांडे तलाव असे आज देखील म्हटल्या जाते. शंकर आणि पार्वती सोबत असणाऱ्या एका बहिरम नावाच्या भैरवाने या परिसराचा उद्धार व्हावा अशी इच्छा शंकराकडे व्यक्त केली. तेव्हा या स्थानावर तुझ्या रूपाने माझाच वास राहील असा आशीर्वाद शंकराने बहिरमाला दिला. तेव्हापासून या भागात बहिरमबुवाची पूजा केली जात असल्याची आख्यायिका आहे.
शेतकऱ्यांची यात्रा म्हणून प्रसिद्ध: बहिरम या स्थानाबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जात असल्या तरी या ठिकाणी अनेक वर्षांपासून बहिरम बुवाच्या दर्शनाला दरवर्षी लाखो भाविक येतात. पूर्वी शेतकऱ्यांच्या शेतातील पीक आल्यावर आणि हाती पैसा आला की शेतकरी बहिरम बुवाच्या यात्रेत यायचे. शेतीसाठी उपयुक्त अवजारे या यात्रेत मिळायची. लगतच्या आदिवासी भागातील अनेक आदिवासी जमातींचे कुळदैवत हे बहिरम बुवा असल्यामुळे आदिवासी समाजाची गर्दी देखील या यात्रेत मोठ्या संख्येने राहते.
20 डिसेंबरला झाली सुरुवात: अनेक वर्षाच्या परंपरेनुसार 20 डिसेंबरला बहिरम बाबा मंदिरात होम हवन करून यात्रेला सुरुवात झाली आहे. ही यात्रा 30 जानेवारीपर्यंत चालते. विशेष म्हणजे, नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त एक जानेवारीला या यात्रेत लाखो भाविकांची गर्दी उसळते. या यात्रेत आता हळूहळू विविध दुकाने थाटली जात असून नवीन वर्षाच्या पहिला दिवसापासून संपूर्ण जानेवारी महिन्यात या यात्रेत लाखो भाविकांची गर्दी उसळते.
यात्रेत हंडीच्या मटणाचे खास वैशिष्ट्य: बहिरम बाबाच्या यात्रेत पूर्वी मंदिरात नवस म्हणून गोकुळ आणि कोंबड्यांचा बळी दिला जायचा. आता ही प्रथा पूर्णतः बंद करण्यात आली आहे. असे असले तरी बहिरमच्या यात्रेत सर्वाधिक प्रमाणात मातीच्या हंडीत मटन शिजवणारे अनेक हॉटेल लागतात. मातीच्या ह्या हंडीतील मटण खाण्यासाठी खवय्यांची गर्दी यात्रेत उसळते. मटन खाणाऱ्या शौकिनांसाठी बहिरमची यात्रा खास पर्वणी आहे.
गणपतीचे आहे खास वैशिष्ट्य: बहिरम बुवाच्या मंदिरालगतच भव्य अशा गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरातील गणपती स्वतःभोवती प्रदक्षिणा मारतो. पूर्वी या गणपतीचे मुख नैऋत्य दिशेकडे होते. आता मात्र ते ईशान्यकडे झाले असल्याची माहिती मंदिरात बालपणापासून नियमित येणारे चांदूरबाजार येथील सतीश अंबुलकर महाराज यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. पूर्वी ही यात्रा अशीच महिनाभर भरत असली तरी या यात्रेचे प्रमाण आजच्या इतके भव्य नव्हते. बहिरम बाबाचे मंदिर पहिले मोकळेच होते. गणपतीचे देऊळ देखील मोकळेच होते असे सतीश अंबुलकर महाराज म्हणाले.
हेही वाचा: