अमरावती : लॉकडाऊनच्या काळात आपण न दिसणाऱ्या कोरोना विषाणूसाठी बंद ठेवला होता. मात्र, आता या केंद्र सरकारच्या दिसणाऱ्या अतिरेकाविरोधात बंद पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारची सध्याची भूमीका ही एखाद्या डाकूप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एखादा डाकू कोणाला लुटून, त्याला ठार करुन निघून जातो; त्याप्रमाणेच केंद्र सध्या शेतकऱ्यांना लुटत आहे अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.
भारत बंदमध्ये सहभागी झालेल्यांना सलाम..
केंद्र सरकारविरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी काल (८ डिसेंबर) भारत बंदची हाक दिली होती. शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ज्या लोकांनी या बंदमध्ये उस्फूर्त सहभाग नोंदवला, त्या सर्वांना माझा सलाम आणि मानाचा मुजरा असे बच्चू कडू म्हणाले.
दोन दिवसात बच्चू कडू पोहोचतील दिल्लीला..
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सध्या देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडूदेखील दिल्लीला निघाले आहेत. कडू यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. मध्यप्रदेशातील मंदोरा येथील गुरुद्वारामधील मुक्कामानंतर ते आता उत्तर प्रदेशच्या दिशेने रवाना झाले आहेत. साधारणपणे दहा तारखेपर्यंत ते दिल्लीला पोहोचतील.
हेही वाचा : सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये आज होणारी बैठक रद्द, शहांचा प्रयत्न असफल