अमरावती Bacchu Kadu : शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणणाऱ्या आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या नावावर शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या नावावर शासनाची 72 लाख 28 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे चांदूरबाजार तालुकाप्रमुख गोपाळ तिरमारे यांनी केला आहे.
सहकारी संस्थेच्या नावावर केली फसवणूक : आमदार बच्चू कडू यांचा त्यांच्या बेलोरा गावी कोळसा युनिट प्रकल्प आहे. कडू यांनी प्रहार कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेतील कोळसा युनिट प्रकल्पासाठी 2007 मध्ये 19 लाख 80 हजार भाग भांडवल शासनाकडून मिळवलं होतं. त्यापैकी 7 लाख 60 हजार रुपये इतक्या रकमेचा संस्थेनं भरणा केला. मात्र, 12 लाख 20 हजार संस्थेकडं अद्यापही बाकी आहे. याच संस्थेच्या दालमिल युनिट प्रकल्पासाठी 2010 मध्ये 12 लाख 41 हजार रुपये कर्ज घेण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा 2010 मध्ये 24 लाख 65 हजार रुपये कर्ज शासनाकडून घेतलं. त्या कर्जाची एकूण रक्कम 32 लाख 86 हजार रुपये बच्चू कडू यांनी लाटल्याचा आरोप गोपाळ तिरमारे यांनी केलाय. कडू यांनी दालमिल प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून पैसे घेतले. मात्र, प्रकल्प कधी सुरूच झाला नाही, असा आरोप तिरमारे यांनी केला आहे. याबाबत संपूर्ण माहिती, माहिती अधिकारात प्राप्त झाल्याचं तिरमारे यांनी सांगितलं. भाग भांडवल, कर्ज, शासकीय भाग भांडवल असं, एकूण 52 लाख 58 हजार या प्रकल्पासाठी मंजूर झाले. ही रक्कम आज व्याजासह 72 लाख 28 हजार रुपयांवर गेली असल्याचं तिरमारे यांचं म्हणणं आहे.
सर्व नातेवाईकांचा सहभाग : आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये त्यांच्या पत्नीसह मुलगा, भाऊ असे नातेवाईक आहेत. राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रक्कम आमदार बच्चू कडू यांनी स्वतःच्या प्रहार कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेसाठी वळवली. मात्र शेतकरी हिताचं कुठलंही काम न करता त्यांनी सर्व शासनाची रक्कम लाटल्याचा आरोप देखील गोपाल तिरमारे यांनी केला.
अयोध्येत रामाच्या चरणी मागावी माफी : शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून आमदार बच्चू कडू 29-30 ऑक्टोबरला आयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी जात आहेत. त्यावेळी आमदार बच्चू कडू यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची माफी मागावी. शेतकऱ्यांच्या नावानं लुटलेली रक्कम शासनाला परत करावी, अशी आमची मागणी असल्याचं तिरमारे यांनी म्हटलंय. तसंच कडू यांच्या विरोधात 30 ऑक्टोबरला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांना सद्बुद्धी प्राप्त होण्यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं गोपाल तिरमारे यांनी सागितलंय.
हेही वाचा -