अमरावती - जिल्ह्यातील अंजनगाव बारी रोडवर मेळघाटातून स्थलांतरित झालेल्या वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी सुरू झालेल्या शाळेची बातमी 'ईटीव्ही भारत'ने लावून धरली होती. या बातमीची दखल घेत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर वीटभट्टी परिसरात पाहणी केली. याच परिसरातील एका मंदिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक घेऊन विविध योजना राबवण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
'आमचे प्रशासन सहसा दुर्लक्षित घटकांकडे जात नाही. अनुकूल वातावरण असलेल्या कार्यालयात बैठका घेतल्या जातात. या घटकांची आत्मीयता, त्यांचे दु:ख कळावे, यासाठी वीटभट्टी परिसरातच बैठक घेतली' असे कडू यावेळी म्हणाले. अमरावतीमधील हा वीटभट्टी शाळा उपक्रम राज्यभर राबवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचार: पोलीस शिपायासह ५ जणांचा मृत्यू, १०५ जण जखमी
या वीटभट्टी शाळेत कामगारांचे १०८ मुले धडे गिरवत आहेत. लहान विद्यार्थ्यांसाठी फिरती आहार व्यवस्था, मुलांसाठी पाळणाघर, आरोग्य तपासणी, प्रत्येकी २० वीटभट्ट्यांचा गट तयार करून त्यांचा लेखाजोखा करणे, या योजना राबवण्याचे आदेश राज्यमंत्र्यांनी दिले.
बच्चू कडूंनी ८ दिवसांपूर्वी या शाळेला भेट देवून ६० हजारांची मदत दिली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा त्यांनी शाळेची पाहणी केली. मेळघाटातील शेकडो कुटुंबे दरवर्षी रोजगाराच्या शोधात वीटभट्टीवर काम करण्यासाठी येत असतात. त्यांच्या सोबत मुलेही येत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी आता राज्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे.