अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव शहरातील सायकलरिक्षा चालकाच्या मुलीने १२ वीच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवून आई-वडिलांच्या कष्टाचे सार्थक केले आहे. कांचन राजपायले, असे या मुलीचे नाव आहे. तिने मिळवलेल्या या यशाचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.
कांचनच्या घरात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. तर घरात अठराविश्व दारिद्र्य. आई-वडील अशिक्षित असून हातमजुरी करून संसाराचा गाडा चालवितात. अशा हलाखीच्या परिस्थितीत बारावीच्या परिक्षेत कांचनने घवघवीत यश मिळवले आहे. अभ्यासक्रमातील अडचणी सोडविण्यासाठी कांचन भावाची मदत घ्यायची. भाऊ उच्च शिक्षण घेत असताना तिची जिद्द चिकाटी पाहून तोही आनंदाने तिची मदत करायचा.
कांचन घरातील सर्व कामे करण्यात तरबेज आहे. घरातील भांडी-कुंडी, साफसफाईचे कामकाज करून उरलेल्या वेळेत कोणतीही शिकवणी न लावता स्वतः च्या जोरावर तिने आई वडिलांच्या कामाचे सार्थक केले आहे. दहावीलाही तिने ७५ टक्के गुण मिळविले तर, बारावीत कला शाखेतून ८० टक्के गुण प्राप्त केले आहे. तिला आता एमपीएससी करून सरकारी नोकरी मिळवायचा मानस आहे.
कांचनने मिळवलेले यश हे तिच्या अशिक्षित आई-वडिलांसाठी मोठी कौतुकाची बाब ठरली आहे. आपल्या पाल्यावरचा दांडगा विश्वास हेच ते त्यांच्या कामाचे फलित समजतात. भविष्यात ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात, असा विश्वास कांचनच्या आईला आहे.