अमरावती IDBI Bank ATM Break : अमरावती शहरातील राजकमल चौक ते अंबादेवी रस्त्यावरील व्यापारी संकुलात असलेले आयडीबीआय बँकेचं एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यांना ते जमलं नाही. आयडीबीआय बँकेच्या एटीएममधील 16 लाख रुपये सुरक्षित आहेत. या प्रकरणी बँक व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलीस ताफा पोचला घटनास्थळी : राजकमल ते अंबादेवी रोडवरील आयडिया बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरक्षा रक्षक असतो. मात्र त्यानंतर या एटीएममध्ये सुरक्षेसाठी कोणीही राहत नाही. त्यामुळं बुधवारी सकाळी 'या' एटीएमच्या तिजोरीचा दरवाजा चोरट्यांनी तोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे, सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार वाकसे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांसोबत श्वानपथक तसंच फिंगरप्रिंट तज्ज्ञही एटीएम केंद्रात पोहोचले आहेत.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबत केली छेडखानी : या एटीएम केंद्रावर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज बँक व्यवस्थापनानं तपासले असता एक इसम तोंडाला कापड बांधून एटीएममध्ये छेडछाड करत असल्याचं दिसून आलं. या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. एटीएम कापण्यासाठी चोरट्यांनी कटरचा वापर केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
अमरावतीत चोरीच्या घटनात वाढ : अशीच घटना मागच्या वर्षी देखील अमरावतीत घडली होती. त्यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम चोरट्यांनी फोडलं होतं. या एटीएममधून चोरट्यांनी 17 लाखांची रुपयांची रोकड लंपास केली होती. यावेळी एटीएम मशीन फोडताना दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले होते. गॅस कटरच्या सहाय्यानं त्यांनी एटीएम फोडून 17 लाखांवर हात साफ केला होता. त्यामुळं अमरावतीत एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसंच शहरात देखील चोरीच्या घटनात वाढ होताना दिसत आहे.
हेही वाचा -