अमरावती - एका प्रकरणात आरोपी असणाऱ्या युवकाचे नाव प्रकरणातून काढून त्याला आरोपमुक्त करण्यासाठी पोलीस शिपायामार्फत 5 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाला बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपुरी गेट पोलीस ठाणे येथून रंगेहाथ अटक केल्यामुळे खळबळ उडाली.
राहुल रामधन जाधव (वय 40) असे लाच स्वीकारणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव असून त्याला लाच स्वीकारण्यासाठी मदत करणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव वैभव अशोक डोईफोडे (वय 33) असे आहे.
नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्रकरणात आरोपी असणाऱ्या युवकाला प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक राहुल जाधव याने आरोपी युवकाच्या मामाकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. या प्रकाराबाबत आरोपीच्या मामांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचून आरोपी युवकाच्या मामाला पाच हजार रुपयांसह नागपुरी गेट पोलीस ठाण्यामध्ये पाठविण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षकाच्या गैरहजेरीत पोलीस शिपाई वैभव डोईफोडेने सदर रक्कम साहेबांनी माझ्याकडे द्यायला सांगितली असल्याचे आरोपीच्या मामाला सांगितले. मात्र, यावेळी सहायक पोलीस निरीक्षक हजर नसल्याने आरोपीचे मामा बुधवारी 5 हजार रुपये घेऊन पुन्हा पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित असणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक राहुल जाधवला 5 हजार रुपये दिले. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली. लाच घेण्यात मदत करणाऱ्या पोलीस शिपायालाही अटक करण्यात आली आहे.