अमरावती - भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कैलास दहिकर नावाच्या जवानाचा कुलू-मनाली परिसरातील पॉइंटवर कर्तव्यावर असताना बुधवारी रात्री आगीच्या दुर्घटनेत मृत्यू झाला. ते अचलपूर तालुक्यातील पिंपळखुंटा येथील रहिवाशी होते.
कैलास कालू दहिकर हे 27 वर्षीय जवान भारतीय सैन्यात बिहार 15 रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. हिमाचल प्रदेशातील कुलू-मनाली येथे कर्तव्यावर असताना अचानक लागलेल्या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. खराब वातावरणामुळे त्यांचे पार्थिव शरीर पोहचण्यास उशीर होत असून सोमवार ते मंगळवारी त्यांचे पार्थिव अमरावतीत दाखल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - लोकांच्या संपर्कातील २ लाख 'हायरिस्क' लोकांच्या कोरोना चाचण्या, १६०० पॉझिटिव्ह
नागपुरात येणार विमानाने पार्थिव
हिमाचल प्रदेशात सध्या कडाक्याची थंडी पडत असून थंडीपासून बचावासाठी त्यांनी रात्री केरोसीनवर चालणारी शेगडी (हिटर) लावली होती. ते झोपेत असतांना त्या शेगडीला अचानक आग लागली व त्या आगीत होरपळून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. आज त्यांच्या पार्थिवावर शवविच्छेदन होणार असून त्यानंतर त्यांचे पार्थिव चंदीगड येथे आणले जाईल. त्यानंतर चंदीगड ते नागपूर असे एअर अॅम्ब्युलन्सने नागपूरला आणण्यात येणार आहे. त्यानंतर येथून सैनिकांच्या वाहनाने त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या गावी आणण्यात येईल.
गावात प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कारांची तयारी
वातावरण खराब असल्याने पार्थिव पोहचण्यास उशिरा होत असून वातावरण चांगले राहिल्यास सोमवार ते मंगळवारी त्यांचे पार्थिव अमरावतीत येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे यांनी दिली. तर, त्यांच्या गावात प्रशासनाचे वतीने अंत्यसंस्काराची तयारी केली जात आहे.
हेही वाचा - बाजारात कोथिंबीरीला कवडीमोल दर, नुकसान धण्यातून भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न