अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींना विशेष शिबिरात 'व्हॅलेंटाईन डे'च्या पूर्वसंध्येला प्रेमविवाह न करण्याची सामूहिक शपथ देण्यात आली. सद्यपरिस्थितीत मुलींवर होणारे अत्याचार, अॅसीड हल्ले पाहता शिक्षकांकडून मुलींना ही शपथ देण्यात आली होती. त्यावर सोशल मीडियातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्या प्रतिक्रिया लक्षात घेता शिबीरात दिलेली शपथ ही उन्मादी प्रेमाच्या विरोधात होती, असे म्हणत महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र हावरे व प्राध्यापक प्रदीप दंदे यांनी माफीनामा सादर करत दिलगिरी व्यक्त केली आहे. हा माफीनामा महाविद्यालयातर्फे प्रसार माध्यमांना दिला आहे.
महिला कला वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर टेंभुर्णी गावात आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मुलींना अशी शपथ देण्यात आली. प्राध्यापक प्रदीप दंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला होता. शपथ देण्यापूर्वी विद्यार्थ्यांना 'युवकांपुढील आव्हाने' या विषयावर दंदे यांनी मार्गदर्शन केले. मुलींवर होणारे वाढते अत्याचार या मुद्द्यावरही त्यांनी उहापोह केला. त्यानंतर मुलींनी घेतलेल्या शपथेमध्ये 'सध्याच्या रीतिरिवाजानुसार कुटुंबाने माझे लग्न हुंडा देऊन लावले तर भावी पिढीतील एक माता म्हणून, माझ्या होणाऱ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही व मुलीसाठी हुंडा देणार नाही.' अशीही शपथ मुलींनी घेतली होती.
हेही वाचा - मी शपथ घेते की.. महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी घेतली कधीही प्रेमविवाह न करण्याची शपथ
यावर सोशल मीडियातून अनेकांनी टीका केली होती. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही यावर आक्षेप नोंदवत मुलींनाच का शपथ घ्यायला लावली. त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की, एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही, कोणावर अॅसिड फेकणार नाही, जिवंत जाळणार नाही, वाकड्या नजरेने मुलींकडे बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार, असे ट्विट त्यांनी केले होते.
हेही वाचा - प्रेमविवाह न करण्याच्या 'त्या' शपथेवर पंकजा मुंडेंना संताप; म्हणाल्या...