अमरावती - महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी अचलपूर तालुक्यातील वज्झर येथील अंबादास पंतवैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहाला भेट दिली. या बालगृहात राहून मोठी झालेली मूकबधिर मुलगी वर्षा तिचे कन्यादान आपण स्वतः करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
गृहमंत्र्यांनी रविवारी सायंकाळी वज्झर येथील बालगृहात जाऊन तेथील मुलांची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली. विशेष म्हणजे यावेळी स्वतः गृहमंत्र्यांनी बालगृहातील चुलीवर स्वतः चहा तयार करून मुलांना पाजला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आश्रमातील मूकबधिर वर्षाचा विवाह याच आश्रमातील समीर याच्याशी ठरला आहे. वर्षाचे कन्यादान गृहमंत्र्यांनी करावे, असे शंकरबाबा पापळकर यांनी सांगताच गृहमंत्री देशमुख यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. नागपूरला हा विवाह केला जाईल व आपण वर्षाचे कन्यादान करू असे ते म्हणाले.
हेही वाचा - 'महापुरुषांची विटंबना केल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही'
विशेष म्हणजे, वर्षा ही एक दिवसाची असताना नागपूर रेल्वेस्थानकावर आढळली होती. तिला आश्रमात आणून तिचे पालन पोषण करण्यात आले. आज ती २२ वर्षांची झाली आहे. वज्झर येथील आश्रमशाळेत १२३ दिव्यांग मुले असून त्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, शासन नियमानुसार या विद्यार्थ्यांना बालगृहात राहता येत नाही. हा नियम या मुलांसाठी जाचक असल्याने त्यात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे शंकरबाबा पापळकर यावेळी म्हणाले. याबाबत आपण सामाजिक न्याय मंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - 'या' घटनांच्या निषेधार्थ धामणगावरेल्वे बंद; निषेध मोर्चाचेही आयोजन