अमरावती - राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील मोठ्या सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार आहे. दरम्यान राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जेव्हापासून महाविकास आघाडी सरकारने वाईन विक्रीचा निर्णय घेतला तेव्हापासून भाजपा नेते राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहे. माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची एकच दिवस हत्या केली, परंतु महाविकास आघाडी सरकार रोजच महात्मा गांधींची व त्यांच्या विचारांची हत्या करत आहे, अशी टीका बोंडेंनी केली आहे. ते अमरावती जिल्ह्यातील वरुडमध्ये बोलत होते.
ज्या महात्मा गांधींनी सांगितले की चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी गावात दारूबंदी करा. त्याच महात्मा गांधींचा वारसा सांगणारे महाविकास आघाडी सरकारचे नेते आज किराणा दुकान आणि मॉलमध्ये दारू विकण्याचे आदेश देत आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. म्हणून नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची एकदाच हत्या केली. मात्र महाविकास आघाडी सरकार रोज हत्या करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पवार म्हणतात वाईन म्हणजे दारू नाही. वाईन म्हणजे फळाचा रस. मग मला असे वाटते की संत्र्याच्या रसात ऐवजी वाईन घेऊनच महात्मा गांधी यांच्या पुतळा पुढे विक्री करावी, असे धक्कादायक वक्तव्य भाजपा नेते अनिल बोंडे यांनी केले आहे.
हेही वाचा - Nana Patole On Gandhi Killing : नाना पटोले म्हणाले, नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा 'वध' केला