अमरावती - भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या नवनीत राणा या पूर्णतः खोटरड्या आहेत. या अनुसूचित जातीसाठी राखीव आणाऱ्या अमरावती मतदार संघात आपण अनुसूचित जातीत मोडतो याचे खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या नवनीत राणा यांचा खोटारडेपणा उच्च न्यायालायत उघड झाला आहे. आता त्याचे संसदेत बसणेही घटनेचा अवमान असून नवनीत राणा यांना शिक्षा होईपर्यंत आम्ही सोडणार नाही, असा इशारा अमरावतीचे माजी खासदार आनंद अडसूळ यांनी दिला आहे. सलग 8 वर्षे लढा दिल्यावर 5 जूनला आनंद अडसूळ यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यावर त्यांनी आज (दि. 11 जून) अमरावतीत येऊन पत्रकार परिषद घेतली.
खासदार म्हणून नवनीत राणा यांचे अधिकार संपले
उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा करणाऱ्या नवनीत राणा यांचे खासदार म्हणून सर्व अधिकार संपुष्टात आले आल्याचे उच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. त्यांना केवळ 2 लाख रुपयांचा दंडच नव्हे तर निवडून आल्या त्या दिवसापासून खासदार म्हणून घेतलेले सर्व लाभ, शासकीय निवास्थानाचे पैसे बाजारभावनुसार नवनीत राणा यांच्याकडून वसूल करावे, असे उच्च न्यायालयाने सांगितले आहे. आम्हला सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत मिळाल्याचे नवनीत राणा खोटे सांगत असून सहा आठवड्यात त्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडे सादर करावेत, असे उच्च न्यायालयाने सांगितले आल्याचे आनंद अडसूळ म्हणाले.
लग्नातच केला होता खोटारडेपणा
रवी राणा आमदार आणि नावनीत राणा खासदार होणार हे ठरवून नवनीत राणा आणि रवी राणा यांचे लग्न झाले. 2 हजार 200 जोडप्यांसह सामूहिक विवाह करणाऱ्या राणा दाम्पत्याने सामुदायिक विवाहात लग्न करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला प्लॉट देणार, असे संगीतले होते. त्या सामुदायिक विवाह सोहळ्यात 22 जोडपेही खरे नव्हते. अनेक नवऱ्या लग्नात आपल्या बाळांना दुध पाजत आल्याचे फोटो अमरावतीकरांनी पाहिले होते, असे आनंद अडसूळ म्हणाले.
नवनीत राणा यांच्या जातीचा 'असा' आहे खोटारडेपणा
खर तर नवनीत राणा यांना त्यांची खरी जात कोणती हेच ठाऊक नाही, असा आरोप करत आनंद अडसूळ यांनी नवनीत राणा यांनी खोटे जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेला खटाटोप पत्रपरिषदेत मांडला. पालघर येथे हरभजनसिंग नावाचा ढाबा आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांचे नावही हरभजनसिंग आहे. राणा दाम्पत्याने पालघरचा ढाबा मालक हरभजनच्या शिधापत्रिकेवर नवनीत राणा यांचे नाव लिहून त्यावर जातीचा उल्लेख केला. या शिधापत्रिकेच्या आधारावर ठाण्याच्या तहसील कार्यालयात जात प्रमाणपत्रासठी अर्ज केला. शिधापत्रिकेवर जातीचा उल्लेख नसतो शिधापत्रिकेऐवजी नवनीत राणा यांच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखल मागितला. या लोकांनी मुंबईतील बोईसर याठिकाणी महापालिकेच्या शाळेतून 1954 साली हरभजसिंग कुंडलेस यांनी शाळा सोडली असल्याचा दाखला मिळविला. आम्ही उच्च न्यायालयात हे प्रकरण नेले तेव्हा 1954 मध्ये बोइसर हा भाग महापालिकेत नव्हता, मग याठिकाणी महापालिकेची शाळा कशी आली, असा प्रश्न उपस्थित केला. उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरवले. यानंतर या मंडळींनी जात पडताळणी समितीकडे नवनीत राणा याचे आजोबा रामसिंग गुनिया यांचे जात प्रमाणपत्र जोडले. हे रामसिंग गुनिया 1932 मध्ये मुंबईच्या भुलेश्वरी भागात एका जिन्याखाली चर्मकार म्हणून काम करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. आता या सगळ्यांचे पत्ते वेगवेगळे आहे. कधी पालघर, कधी भुलेश्वरी तर कधी घाटकोपर असा आहे.
नवनीत राणा यांच्या शाळा, महाविद्यालयातही घोळ
नवनीत राणा यांच्या शाळा आणि महाविद्यलयाच्या दाखल्यातही घोळ आहे. त्यांची शिक्षण लॉर्ड हरीश या महापालिलेच्या शाळेत झालेत तर शालेय शिक्षणानंतर त्यांनी खालसा कॉलेजला प्रवेश घेतला, असे दाखविले आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी चौकशी केली तर ज्या वर्षी नवनीत राणा यांना शाळेने शाळा सोडल्याचा दाखला दिला, त्यावेळी या शाळेत नसतानाही काही तरी अडजस्टमेंट केल्याचे स्पष्ट दिसून येते. अनेक ठिकाणी नोंद वाहीचे पाने, अक्षरही बदलेली दिसत असल्याचे उच्च न्यायालयाला आढळून आल्याचा आनंद अडसूळ म्हणाले.
सर्वोच्च न्यायालय नवनीत राणांची फेटाळणार याचिका
उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल अगदी स्पष्ट आणि ठोस स्वरूपात दिला आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नवनीत राणा यांच्याकडून दाखल होणारी याचिका फेटाळून लावणार, असा विश्वास आनंद अडसूळ यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार- नाना पटोले