अमरावती - महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पिंपळखुटा येथे बुधवारी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. गावामध्ये जनजागृती आणि श्रमकरी लोकांना आधार मिळावा या करिता महाश्रमदानाचे आयोजन करत पिंपळखुटा येथील गिट्टी खदान येथे तलावातील गाळ उपसा केला गेला.
तलावातून एकूण २० ट्रॅक्टर म्हणजेच ५५ घनमीटर गाळ उपसा सर्व जलमित्रांनी मिळून एकजुटीने केला. या कामात सुमारे ४०० जलमित्र आणि गावकऱ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाला आमदार डॉ. अनिल बोंडे, डॉ. संजय बेलसरे, विक्रम ठाकरे, आशिष देवगडे, डॉ. सुनील होले यांच्यासह नागपूर येथून आलेले बरेच जलमित्र उपस्थित होते.
श्रमदानानंतर आमदार अनिल बोंडे यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि डिझेल बँकेत १५१ लिटर डिझेल दान केले. तर बाकी स्पर्धेतील गावांकरिता कामासाठी मशीनची व्यवस्था करून देऊ, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला पिंपळखुटा येथील सरपंच पडोळे, ग्रामसेवक भातुलकर, उपसरपंच, सदस्य, युवा पथक, गावकरी मंडळी आणि पाणी फऊंडेशनचे पूर्ण पथक उपस्थित होते.